Minister Mangalprabhat Lodha reviewed the work of the departments of tourism, skill development, employment, women and child development
*मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला पर्यटन, कौशल्य विकास,रोजगार, महिला व बालविकास विभागांचा आढावा*.. रत्नागिरी,दि.२८:- राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बालविकास विभाग, पर्यटन विभाग आदि विभागांचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, अपर जिल्हाधिकारी आणि संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महिला बचतगटांचे बळकटीकरण करण्यासाठी ब्रँडिंग व मार्केटिंग करा. सामाजिक संस्था, कंपन्या आदींचे सहकार्य घेऊन अंगणवाडी दत्तक घेण्याबाबत प्रोत्साहन द्या. आयटीआयच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना मंत्रीमहोदयांनी यावेळी संबधित विभागांना दिल्या. ग्रामपंचायत स्तरावर उद्योजकता कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्याबाबतचा आढावा मंत्रीमहोदयांनी घेतला. जिल्हयात 11 ठिकाणी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता इनुजा शेख यांनी दिली. जिल्हयामधील पर्यटन स्थळे, प्रसिध्द धार्मिक स्थळे,ऐतिहासिक व पुरातन स्थळे , नव्याने शोध लागलेला कातळशिल्प यांचा आढावा घेताना पर्यटन मंत्री महोदयांनी यावेळी प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत मंजूर कामे, सुरु असलेली कामे आणि प्रास्तावित कामांचाही आढावा घेतला. यावेळी महिला अर्थिक विकास महामंडळातर्फे दोन महिला बचतगटांना प्रत्येकी 10 लाख व 6 लाख रुपयाचे कर्ज वाटप वितरण मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाकडून कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये गुंतवणूक प्रमाणपत्र 4 लाभार्थ्यांना देण्यात आले. महिला व बाल विकास विभाग विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत एकूण 5 लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्र राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते देण्यात आले.