ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा
रत्नागिरी हि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असून परशुरामाची भूमी, व्याडमुनींची भूमी म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मध्ययुगात अनेक युरोपियन प्रवाशांनी व धर्मोपदेशकांनी कोकणच्या किनारपट्टीला भेट दिली होती. प्राचीन कोकणवर मौर्य, सातवाहन, त्रैकूटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब व यादव राजवंशांनी स्वामित्व गाजविले. सातवाहनाच्या काळात पन्हाळेकाजी येथील लेणी बौद्ध धर्माच्या अध्ययनाची व प्रसाराचे केंद्र होती. रत्नागिरीचा देश-परदेशातील अन्य भागांशी समुद्रमार्गाने व्यापार झाल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पा.वा.काणे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे अशा तीन ‘भारतरत्नांची’ ही भूमी. याव्यतिरिक्त ब्रम्हदेशाचा राजा थिबा यांना तत्कालिन इंग्रज सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात नजर कैदेत ठेवले होते. रत्नागिरी शहरातील थिबा राजवाडा व थिबा राजा यांची समाधीला भेट देण्यासाठी म्यानमारमधील नागरीक तसेच उच्च पदस्थ व्यक्ती वेळोवेळी भेट देत असतात. तसेच ब्रिटीश सरकारने रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर सारख्या महापुरुषामुळे रत्नागिरी जिल्हा पावन झाला आहे.
रत्नागिरी जिल्हा प्राचीन महत्त्व व ऐतिहासिक वारसा लाभलेला प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य स्थापनेसाठी या भूमीने मोठे योगदान दिले असून येथील नरवीरांनी पराक्रम गाजवला. जिल्ह्याचे अनेक सुपुत्र सैन्यात तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, महर्षी कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, एस.एम. जोशी, हुतात्मा अनंत कान्हेरे, कविवर्य केशवसूत, नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकर यांसारख्या थोर विभूतींनी या भूमीला गौरव दिला आहे. ब्रिटीशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवले असल्याने या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढले.
रत्नागिरी कोकणच्या लोकसंस्कृतीचे खरे प्रतिनिधित्व करते. येथील लोकजीवनात उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ दिसून येतो. विटांची कौलारू घरे, पारंपारिक रुढी, परंपरा आणि सण-उत्सव येथील सांस्कृतिक समृद्धतेचे दर्शन घडवतात. होळी व गौरी-गणपती हे जिल्ह्यातील प्रमुख सण असून यावेळी बाहेरगावी असलेले नागरिकही गावाकडे परत येतात. जाखडी हे पारंपारिक नृत्यप्रकार तसेच नमन खेळ, दशावतार यांसारख्या कलांच्या माध्यमातून लोककला जपली जाते. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा संगम आहे.