• Site Map
  • Accessibility Links
  • मराठी
Close

जिल्ह्याविषयी

रत्नागिरी हि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तसेच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी. तसेच ब्रिटीश सरकारने रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर सारख्या महापुरुषामुळे रत्नागिरी जिल्हा पावन झाला आहे. रत्नागिरी हे भारतातील पश्चिम किनारपट्टीत वसलेले महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात असंख्य किनारे, खाडी, समुद्र किल्ले, बंदरं , गरम पाण्याचे झरे, लेणी, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे, निसर्गरम्य स्थळे आहेत.

रत्नागिरी जिल्हा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्द जिल्हा आहे. जिल्ह्यातील विस्तीर्ण सागरकिनारे, त्यालगत बहरणारा मासेमारी व्यवसाय, किना-यावरील अद्ययावत बंदरे, तेथून होणारा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यापार, जिल्ह्यातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वेच्या माध्यमातून विकासाला मिळालेली गती, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रत्नागिरीच्या हापूस आंब्याची अवीट गोडी, तितकीच मधुर असलेली इथली लोकसंस्कृती, इथली मंदिरे आणि त्यांच्या बरोबरीने इथे असलेली पर्यटन वाढीची अमर्याद संधी, ही सगळी वैशिष्टे रत्नागिरी जिल्हयाची स्वतंत्र ओळख निर्माण करतात.

या जिल्ह्याला निसर्गाने जे विपूल सृष्टीसौंदर्याचं उत्कट देणं दिलं आहे. यामुळेच निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्याकडे पर्यटक आकर्षित होतात. तसेच पर्यटकांचं स्वागत करायला इथला कोकणी माणूस नेहमीच तत्पर असतो. गावातलं कौलारू घर, घरासमोरील अंगण, घरामागची परसबाग, अशा कौटुंबिक वातावरणात राहण्याचा आनंद देणारी पर्यटन विकास महामंडळाची निवास न्याहारी सर्व स्तरावरील पर्यटकांना परडवणारी असल्याने लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे पर्यटक रत्नागिरीच्या मोहात पडतात.