रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्वाची पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे आहेत.
गणपतीपुळे:
रत्नागिरीपासून साधारणपणे 40 कि.मी. अंतरावर असलेले गणपतीपुळे हे श्रीगणपतीचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि पर्यटनाच्या विविध सोयींमुळे इथे येणा-या भक्तांची तसेच पर्यटकांची संख्या मोठी असते. मालगुंड हे कवी केशवसुतांचे जन्मस्थान गणपतीपुळेपासून जवळ आहे. तिथे कवी केशवसुतांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक:
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे आंबडवे हे मूळ गांव आहे. ते मंडणगडपासून 13 कि.मी. अंतरावर असून येथे डॉ. आंबेडकर यांच्या मूळ घराचे स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. याठिकाणी डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे.
लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान:
लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असलेले घर रत्नागिरी शहरातच आहे. हे जन्मस्थान शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केले आहे. लोकमान्यांचे वडील शिक्षक म्हणून नोकरीला असताना टिळक आळीत श्रीमती इंदिराबाई गोरे यांच्या वाड्यात ते भाड्याने राहत होते. तेथेच लोकमान्यांचा जन्म 23 जुलै, 1856 रोजी झाला. सन 1856 ते सन 1866 पर्यंत लोकमान्य टिळक येथे राहत होते.
थिबापॅलेस
: थिबा पॅलेस हा रत्नागिरी शहरातील राजवाडा म्हणून ओळखला जातो. हा राजवाडा ब्रिटीशांनी बांधला. सन 1885 साली ब्रिटिशांनी ब्रम्हदेशाच्या थिबा राजास अटक करून याच पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते. पॅगोडा पध्दतीचे उतरते छप्पर असलेला हा पॅलेस तीन मजली आहे.
पतितपावन मंदिर:
अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेच्या लढ्यातील महत्वाचं ठरलेले पतितपावन मंदिर रत्नागिरी शहरात आहे. रत्नागिरीतील भागोजी शेठ कीर यांच्या सहकार्यानं वीर सावरकरांनी हे मंदिर बांधले. सन 1929 मध्ये बांधलेल्या आणि तत्कालीन अस्पृश्य बांधवांसाठी खुले झालेले हे देशातील पहिले मंदिर आहे. सवर्ण आणि तत्कालीन अस्पृश्य बांधवांनी याच मंदिरात सहभोजन केल्याची इतिहासात नोंद आहे. रत्नागिरीच्या पुरोगामीत्वाचं हे उदाहरण आहे.
स्वामी स्वरुपानंद आश्रम:
स्वामी स्वरूपानंद यांचे आश्रम असलेले पावस हे रत्नागिरी पासून केवळ 15 कि.मी. अंतरावर आहे. पन्हाळे काझी येथील 29 लेणी देखील पर्यटकांचे आकर्षण आहेत.
कसबा संगमेश्वर:
मुंबई-गोवा महामार्गावरील शास्त्री आणि सोनवी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गांव म्हणजे संगमेश्वर. संगमेश्वरच्या कसबा भागाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे. या भागात पांडवांनी सुमारे 360 मंदिरे बांधल्याची आख्यायिका आहे. त्यापैकी कर्णेश्वर मंदिर हे एक प्रमुख मंदिर आहे. चालुक्य घराण्यातील कर्ण राज्याने बांधलेले कर्णेश्वराचे हे हेमाडपंथी मंदिर पुरातन असून महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. या मंदिराजवळच सरदेसाईंचा वाडा असून या वाड्यात छत्रपती संभाजीराजे कलुशा कबजीसह असतांना औरंगजेबाने त्यांना अटक करून त्यांचा निर्घृण छळ व हत्या केली. संभाजी महाराजांनी येथे हौतात्म्य पत्करले या ठिकाणी त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.
हेदवी येथील श्रीगणपती मंदिर:
गुहागरपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर हेदवी या गावी पेशवे काळातील श्रीगणपतीचे प्रसिध्द मंदिर आहे. मंदिरातील मुर्ती “श्री दशभुजा लक्ष्मीगणेश” नावाने ओळखली जाते. या ठिकाणी माघी चतुर्थीला मोठी यात्रा भरते.
आडिवरे येथील महाकाली मंदिर व राजापूरची गंगा:
राजापूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आडिवरे येथे श्रीमहाकालीचे पुरातन मंदिर आहे. आडिवरे येथे शिलाहार राजाची सत्ता असताना आडिवरे ही भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. राजापूर तालुक्यातील राजापूरची दर तीन वर्षानी येणारी गंगाही प्रसिध्द आहे. या ठिकाणाला गंगा तिर्थ असे संबोधले जाते. जवळच उन्हाळे हे गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाण आहे. राजापूर जवळच धूतपापेश्वराचे पुरातन मंदिर आहे.
श्री क्षेत्र परशुराम मंदिर:
विष्णूचा सहावा अवतार म्हणून ओळखल्या जाणा-या परशुरामाचे प्राचीन मंदिर चिपळूणपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलीकडे डाव्या बाजूला डोंगरावर जाणारा रस्ता आहे. मंदिराच्या गाभा-यात बह्मा, विष्णू आणि महेशाच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या दुस-या गाभा-यात श्री परशुरामांचा पलंग असून त्यावर श्रींच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. या मंदिराच्या बाजूलाच परशुरामाने बाण मारून निर्माण केलेला बाणगंगा तलाव आहे.
श्रीक्षेत्र मार्लेश्वर:
संगमेश्वर तालुक्यात देवरुखपासून 18 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या निसर्गरम्य द-याखो-यात वसलेले श्रीक्षेत्र मार्लेश्वर हे श्री शंकराचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. डोंगराला वळसा घालून उंच कड्यावर गेल्यावर एका गुहेत हे देवस्थान आहे. मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. या डोंगरावर एक मोठा धबधबा असून त्याखाली स्नान करण्यासाठी भाविकांची खूप गर्दी असते. पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणा-या धबधब्यांची शोभा अवर्णनीय असते. हिरवागार परिसर आणि विविध पक्ष्यांच्या सहवासात पायवाटेवरून चालताना थकवा जाणवत नाही.
श्रीक्षेत्र वेळणेश्वर:
वेळणेश्वर येथील प्रसिध्द महादेव मंदिराला 1200 वर्षाचा प्राचीन वारसा आहे. वेळणेश्वरला नितळ व सुरक्षित समुद्रकिनारा लाभलेला आहे.