Close

Superintendent, State Excise Department Ratnagiri

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उद्देश
या विभागाची प्रमुख कार्ये म्हणजे अधिनियमातील अनुज्ञप्त्या देणे, त्यांची तपासणी करणे व नियंत्रण ठेवणे आणि प्राधान्याने मुंबई दारुबंदी अधिनियम, 1949 व अन्य अधिनियमानुसार विविध नियंत्रणाची अंमलबजावणी करणे. मद्यार्क, पेय मद्यावरील कर वसुल करणे ही महत्वाची कर्तव्ये आहेत. त्याशिवाय मुंबई दारुबंदी कायदा, 1949 व एन.डी.पी.एस. कायदा, 1985 अंतर्गत गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हे नोंदवून प्रकरणे न्यायालयात दाखल करणे.

विभागा अंतर्गत राबविण्यात येणारे कायदे व नियम
1. महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949
2. दि. नार्कोटिक ड्रग्ज अॅंड सायकोट्रॉफीक सबस्टन्सेस अॅक्ट, 1985
3. मुंबई विदेशी मद्य नियम, 1953
4. महाराष्ट्र देशी मद्य नियम, 1973
5. मुंबई मळी नियम, 1955
6. मुंबई मद्यार्क नियम, 1951
7. मुंबई दारुबंदी विशेषाधिकार शुल्क नियम, 1954

महत्वाचे अधिकार विषयक तरतुदी
1. मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 चे नियम 44 अन्वये नवीन एफएल-III अनुज्ञप्तीच्या मंजुरीचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीस प्रदान करण्यात आलेले आहेत. सदर समितीमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व मा. पोलीस अधीक्षक हे सदस्य असून अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क हे सदस्य सचिव आहेत.
2. सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या ज्यांचे मंजुरी सक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी आहेत अशा सर्व अनुज्ञप्त्यांचे नियमन जसे की, अनुज्ञप्तीचे स्थलांतर (एफएल-III अनुज्ञप्तीचे जिल्ह्यांतर्गत स्थलांतर तसेच एफएल-II व सीएल-III अनुज्ञप्तीचे तालुकाअंतर्गत स्थलांतर), अनुज्ञप्ती एका नावावरुन दुसऱ्या नावावर हस्तांतर करणे, अनुज्ञप्तीमध्ये भागिदार घेणे किंवा वगळणे इ. प्रकारची कार्यवाहीबाबतचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.
3. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येणाऱ्या अनुज्ञप्ती निरीक्षणा दरम्यान आढळून आलेल्या विसंगतीबाबत नोंदविण्यात आलेली नियमभंग प्रकरणे महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 104 नुसार तडजोड शुल्क आकारुन निकाली काढणे, नियमभंग प्रकरणी रुपये 50,000/- पर्यंत तडजोड शुल्क आकारुन नियमभंग प्रकरण निकाली काढण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना आहेत. तसेच नियमभंग प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे असल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 54 व 56 अन्वये अनुज्ञप्ती निलंबित / रद्द करण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना आहेत.
4. गुन्हा अन्वेषणात जप्त केलेल्या वस्तु, वाहने इत्यादींना मा. न्यायालयाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 98 व 99 अन्वये सदर बाबी शासन जमा करण्याबाबत अथवा नियमानुसार विल्हेवाट लावणेबाबत आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 101 नुसार त्याबाबतची संपूर्ण प्रक्रीया मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने करण्यात येते.
5. महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील तरतुदी अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशाविरुध्द अपिल स्विकारण्याचे अधिकार महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 137 नुसार मा. जिल्हाधिकारी यांना आहेत.
6. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून व लोकहितास्तव मद्यविक्री अनुज्ञप्तींचे व्यवहार बंद करण्याचे अधिकार महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 नुसार मा. जिल्हाधिकारी यांना आहेत.

अबकरी अनुज्ञप्ती मंजूरीसंदर्भात अर्जाचे नमुने व अधिक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.